Friday, July 20, 2012

श्रावण मुंबईतला.....

लहानपणापासून श्रावण म्हणल की मनात न काळात श्रावणमासी हर्ष मानसी या बालकवींच्या ओळी येतात. पण आपल्या मुंबापुरीत जिथे सर्वत्र  गर्दी, धांदल आणि धावणाऱ्या विवंचनांची  हिरवळ  आहे तिथे बालकवींच्या कवितेतातला  श्रावण कसा सापडावा ??. पण याचा अर्थ असा नाही कि श्रावणाच सौंदर्य मुंबई मध्ये मिळत नाही. जसा आज सकाळी श्रावण अवचित भेटला मला म्हणाला मुंबई मध्ये पहिल्यांदाच भेटतोय आपण ये तुला मुंबईच्या एका अनोख्या रूपाची सफर घडवतो. मग काय दादर च्या चाळीतल्या बाल्कनी मध्ये उभा राहिलो आणि माझी मुंबई श्रावण सहल सुरु झाली
कसलं भारी आहे ना हा श्रावण ज्याला हात लावेल ते फक्त सुंदर आणि सुंदर च दिसायला लागत. रोजचा गर्दी नि गाड्यांनी भरलेला रस्ता आज एकदम मस्त काळा कुळकुळीत झाला होता, न चिखल न चिकचिक फक्त ओलसर काळा रस्ता धुतलेल्या काळ्या  करावन्दासारखा ताजा तवाना वाटला मला. समोरच्या चाळीची कौले मगाशी पडलेल्या श्रावण सरींनी भिजली होती आणि आत्ता क्षणात पडलेल्या ऊन्हामुळे छान चमकत होती. पान्हाळीवर अडकलेले पाण्याचे थेंब तर हिऱ्याप्रमाणे चमकत होते. मला अचानक खूप भारी वाटायला लागल होत.
मनाला आवर घालून ऑफिसला जायला निघालो अन अचानक पुन्हा श्रावणाची सर आली. बाहेर माझ्याप्रमाणे ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची  एकच पंचाईत झाली. आडोश्याला जाऊन छत्री, रेनकोट काढे पर्यंत पाउस थांबला देखील आणि मस्त चमचमणार उन्ह पडल. अनेकांनी पाउसाला  यथेछ शिव्या घातल्या.  त्यांच्या मनातले संवाद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. कारण मुंबईच्या लोकांना पाउस म्हणाल कि 26 जुलै ची काळी रात्र च दिसते ते या लोकाना हा श्रावण  त्याच्या  सरी  कशा  दिसणार ?  असो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याच जळत त्यालाच कळत. पण मी मात्र हे सगळ enjoy करत होतो. रस्त्यातून निरनिराळ्या छत्र्यांची नक्षीदार फुल उमलली होती. कुणी एकाच छत्रीतून दोघे जण  जात जात Officially Romanace करत होती.
कधी नव्हे तर आज ट्रेन मधेही उकडणारा घामाचा, अथवा झोडपणाऱ्या पाउसाचा स्पर्श नव्हता. होता फक्त श्रावणाच्या थंड सरींचा थंडावा. क्षणभरासाठी आपण दार्जीलिंगच्या च ट्रेन मधे आहोत कि काय अस वाटल. श्रावाणानी माझ्या दृष्टीलाच स्पर्श केला होता त्यामूळे ज्या गोष्टीकडे पाहत होतो ती प्रत्येक गोष्ट च सुंदर दिसत होती.
संध्याकाळ झाली तशी श्रावणाचा सरी थांबल्या तसं सगळ तेज सार सौंदर्य च लोपल ट्रेन चा संप, त्यामुळे होणारी परवड पुन्हा चित्र जैसे थे... मुंबई च सौंदर्य ही श्रावणसरी सारखाच तर आहे ना..क्षणांत येते सरसर हिरवे क्षणात फिरुनी उन्ह पडे......